Tuesday, August 31, 2010

कुटुंब

कुणा एका तपस्व्याच्या घरी
जेव्हा काळीज जन्माला आलं
त्याचा धगधगता भाता पाहून
बाळंतीण म्हणाली, "हे माझं नाही."

सुईण काळजाला फटके मारत
ते रडायची वाट पाहत होती
तर तपस्वी काठीवर हात ठेउन
रामदासांच्या पोझमध्ये उभा होता

शेवटी काळजाला पाणी फुटलं
"हुश्श" म्हणून सुईण उठली, बाहेर आली
पाहते तर तपस्वी अंधारी येउन पडला होता
लाल-पांढरी काठी मात्र तशीच उभी होती

बाळंतीणीने मग काठी उचलून
तपस्व्याच्या पोटावर तीस वार केले
सुईण बघत उभी होती
काळजाला थोपटत पगार मागत होती

तेवढ्यात जवळपास कुठेतरी स्फोट झाला
दोन्ही बायका काठीवर स्वार
हॅरी पॅाटर सारख्या उडून गेल्या
आल्या तशाच सडून मेल्या

स्फोटामुळे काळीज उडून
झाडाला जाऊन लटकले होते
आणि तपस्व्याच्या छातीतून
रक्ताची पिचकारी उडत होती

आता हळूहळू पिचकारी
लांबपर्यंत जाईल
वीस वर्षांनंतर
काळजाच्या तोंडाशी पोचेल

मग काळजाला हुशारी येईल
आणि तेव्हापासून काळीज
आईच्या दुधाची तहान
बापाच्या रक्तावर भागवेल